खाद्यतेल स्वस्त होणार आयात शुल्कात दहा टक्के कपात; केंद्राचे महत्त्वपूर्ण पाऊल

आयात शुल्कात दहा टक्के कपात; केंद्राचे महत्त्वपूर्ण पाऊल

आम जनतेला महागाईपासून दिलासा देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कच्चे पाम तेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि कच्चे सोयाबीन तेल यावरील आयात शुल्कात दहा टक्के कपात केली आहे. यामुळे या खाद्यतेलाच्या किमती सुमारे दहा टक्क्यांनी कमी होतील, असा सर्वसाधारण अंदाज आहे. मात्र, रिफाईंड तेलावरील आयात शुल्कात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारने शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क २७.५ टक्क्यांवरून १६.५ टक्के करण्यात आले आहे. एकूण गरजेचा विचार करता, पन्नास टक्क्यांहून अधिक खाद्यतेल भारत आयात करतो. ही आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसारख्या देशांतून पाम तेलाच्या माध्यमातून केली जाते. अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेनकडून सोयाबीनसह सूर्यफूल तेलाची आयात केली जाते.सरकारने आयात शुल्कात कपात केल्यामुळे आता खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत.

रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कायममहागाईपासून मिळणार दिलासा

किचन बजेटवरील ताण घटणार

रिफाइंड तेलाच्या किमती 'जैसे थे'

सरकारने कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कात दहा टक्के कपात केली असली,तरी सोयाबीन रिफाईंड तेल, सूर्यफूल तेल किंवा रिफाईंड पाम तेल यावरील आयात शुल्कात बदल करण्यात आलेला नाही. यावर सध्या ३५.७५ टक्के आयात कर आकारला जातो. सध्या रिफाईंड आणि कच्च्या खाद्यतेलामधील आयात शुल्कातील तफावत १९.२५ टक्क्यांपर्यंत आहे. तथापि, आता या निर्णयामुळे आयातदारांना रिफाईंड तेलाऐवजी कच्चे खाद्यतेल आणण्यास प्रवृत्त केले जाईल आणि त्यामुळे स्थानिक रिफायनिंग उद्योगाला चालना मिळेल.

महिनाभरात असा झाला बदल

मागील एका महिन्यात तेलाच्या किमतीत चढ-उतार आले होते. पाम तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. तसेच, मोहरी तेल, सोयाबीन तेलाच्या किमती वाढल्या होत्या. सूर्यफूल तेलाच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. अधिकृत आकडेवारीनुसार, ३० एप्रिल रोजी शेंगदाणा तेल १९०.४४ रुपये प्रतिकिलो होते. ३० मे रोजी शेंगदाणा तेल १८८.४७रुपयांवर आले. मात्र, मोहरी तेल, वनस्पती तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमती क्रमशः १.६४ रुपया, १.६ रुपया आणि ०.८२ पैशांनी वधारल्या.

तेल उद्योगांनाही फायदा

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा नागरिकांबरोबरच देशांतर्गत तेल शुद्धीकरण करणाऱ्या उद्योगांनाही होणार आहे. सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) आणि इंडियन व्हेजिटेबल ऑईल प्रोड्युसर्स असोसिएशन (आयव्हीपीए) यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. एसईएचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले की, या निर्णयामुळे देशांतर्गत उद्योगांना तेल शुद्धीकरण क्षमता पूर्ण ताकदीने वापरण्यास मदत होईल आणि खाद्यतेलाच्या किरकोळ किमती कमी होतील. त्यामुळे वनस्पती तेल शुद्धीकरण कंपन्या आणि ग्राहकांसाठी ही दोन्ही बाजूंनी फायदेशीर परिस्थिती आहे.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.