पाच वर्षांत पृथ्वीचे तापमान वाढणार जागतिक हवामान संघटनेचा इशारा
पाच वर्षांत पृथ्वीचे तापमान वाढणार जागतिक हवामान संघटनेचा इशारा
संघटनेच्या ताज्या अहवालानुसार २०२५ ते २०२९ या काळात किमान एका वर्षात जागतिक सरासरी तापमान १८५०-१९०० या पूर्वऔद्योगिक काळाच्या तुलनेत १.५ अंश सेल्सिअसने अधिक असेल, अशी ८६ टक्के शक्यता आहे.
तापमानवाढीची दाट शक्यता
याच कालावधीत म्हणजे २०२५ ते २०२९ या पाच वर्षांच्या सरासरी तापमानवाढीची १.५ अंश सेल्सिअस मर्यादा ओलांडण्याची शक्यता आता ७० टक्के इतकी आहे. ही शक्यता गेल्या वर्षीच्या अंदाजाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढली आहे. तसेच या काळात किमान एका वर्षात २०२४ पेक्षा अधिक तापमान नोंदवले जाईल, अशी ८० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तापमानवाढीचे परिणाम
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, प्रत्येक अंश तापमानवाढीमुळे उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, दुष्काळ, हिमनद्या व बर्फसाठ्याचे वितळणे, महासागरातील उष्णता आणि समुद्र पातळीत वाढ यांसारखे हवामानविषयक संकटे अधिक तीव्र होत आहेत.
पर्जन्यमानातील बदल
पावसाच्या पद्धतीतही मोठा बदल दिसून येणार आहे. सहेल, उत्तर युरोप, अलास्का आणि उत्तर सायबेरियात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर अॅमेझॉन क्षेत्रात कमी पावसाची शक्यता आहे. दक्षिण आशियात म्हणजे भारतासह शेजारील देशांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल; पण हंगामांनुसार बदल होत राहतील.
पॅरिस कराराचे आव्हान
पॅरिस हवामान करारानुसार जागतिक तापमानवाढ २ अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्याचे आणि शक्य असल्यास १.५ अंश सेल्सिअसच्या मयदितच मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य आहे. मात्र, WMO च्या अहवालातून स्पष्ट होते की, ही तापमान मर्यादा तात्पुरती का होईना, पण अधिकाधिक वेळा ओलांडली जात आहे. हवामान बदलावर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित करतो.
आर्क्टिकमध्ये वाढलेले संकट
आर्क्टिक भागात जागतिक सरासरीच्या तुलनेत साडेतीन पट वेगाने तापमानवाढ होणार असून तेथील हिवाळी तापमान हे अलीकडील ३० वर्षांच्या सरासरीपेक्षा २.४ अंश सेल्सिअसने अधिक असेल, असा अंदाज आहे.

Post a Comment