या' जीवांची शेपूट असते त्यांचे हत्यार
आपण बहुतांश वेळा प्राण्यांच्या शेपट्यांकडे केवळ संतुलन राखण्याचे किंवा संकेत देण्याचे साधन म्हणून पाहतो; पण निसर्गाच्या गूढ दुनियेत काही असे प्राणी आहेत, ज्यांची शेपटी फक्त शोभेची नाही, तर जीवघेणीही असते. शत्रूला जखमी करणारी, घाबरवून पळवणारी आणि काही वेळा तर मारून टाकणारीसुद्धा! चला जाणून घेऊया अशा काही जीवांबद्दल ज्यांच्या शेपटीत प्राण वाचवण्याची ताकद आणि प्राण घेण्याची क्षमता दडलेली आहे.
स्टिंगरे : समुद्रात लपलेले विषारी अस्त्र
पाण्यात शांतपणे फिरणारा स्टिंगरे मासा दिसायला निरुपद्रवी वाटतो; पण त्याच्या शेपटीत एक धारदार आणि विषारी काटा लपलेला असतो. धोका वाटल्यास स्टिंगरे अपल्या शेपटीने जोरात डंख करतो, जो अतिशय वेदनादायक आणि खोल घाव करणारा असतो. अनेकदा लोक चुकून त्याच्यावर पाय ठेवतात आणि अपघात होतो. डंख जर संवेदनशील भागात लागला, तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
कोमोडो ड्रॅगन :एकच फटका, शत्रू साफ
कोमोडो ड्रॅगन ही जगातील सर्वात मोठी सरडा प्रजाती आहे. भल्या मोठ्या देहासह, विषारी चावणे आणि भीतीदायक रूप हेच पुरेसे असताना, त्याची खरी ताकद आहे, त्याची लांब, मजबूत शेपटी. धोका भासल्यावर तो शेपटी इतक्या जोरात फटकारतो की, समोरचा शत्रू तत्काळ जमिनीवर पडतो.
मगर : जेव्हा शेपटी होते घणासारखी
आपण सर्वजण मगरीचे धोकादायक जबडे ओळखतो; पण तिची शेपटीसुद्धा एक प्रभावी हत्यार आहे. मगर चिडली की ती आपली वजनदार, मजबूत शेपटीचा असा प्रहार करते की, माणूस असो वा अन्य प्राणी, क्षणात कोसळू शकतो! या फटक्यांमुळे हाडे मोडू शकतात किंवा आतून गंभीर दुखापत होऊ शकते.
व्हिप स्कॉर्पियन: शेपटीतून अॅसिडचा हल्ला
व्हिप स्कॉर्पियन हा दिसायला विंचू आणि कोळ्याचा मिलाफ वाटतो. तो न डंख मारतो, ना विषारी असतो; पण त्याची शेपटी एक वेगळाच बचावात्मक मार्ग निवडते, ती उग्र वासाचा अॅसिड स्प्रे करते ! हा स्प्रे डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करतो आणि श्वास घेणे कठीण करतो. यामुळेच त्याला 'विनेगरून' असेही म्हणतात.
विचू : लहानशी शेपटी; पण घातक डंख
विंचू आपल्या वळलेल्या शेपटीतून विजेसारख्या वेगाने डंख करतो. साधारण विंचवाचे विष जरी सौम्य असले, तरी काही प्रजाती जसे की इंडियन रेड स्कॉर्पियन अतिशय विषारी असतात. त्यांचा डंख हृदयावर परिणाम करू शकतो, त्यामुळे अशा वेळेस त्वरित वैद्यकीय मदत आवश्यक असते.
.


.jpg)


Post a Comment