कसं असत पॉलिसीवाल्यांच जीवन.....
पॉलिसीवाले कशी करतात जीवाची धरपड.....
ऑफिस मधून बाहेर पडून घरच्या रस्त्यावर असताना नेहमीचा स्टॉप सावंत चष्मेवाल्यांचा. आज पण अरुण सावंतच्या दुकानासमोर गाडी उभी केली आणि बॅग घेऊन आत गेलो. नेहमीसारखी अरुणची चेष्टा केली एवढ्यात चष्म्याची काडी तुटली म्हणून आलेला एक माणूस मला म्हणाला ‘‘काय ओ तुम्ही एलआयसीवाले मा...!’’ मी म्हटले - होय. काय तुमची पॉलिसी काढायची आहे काय? ‘‘नाय ओ माझ्या बायकोचा कायतरी काम आसा, तिची पॉलिसी मोडूची आसा बहुतेक, तुम्ही आमच्या घराकडे येशात एकदा?’’ मी म्हटले - ठीक आहे, मी जातो तुमच्या घरी, पॉलिसीचा काय प्रॉब्लेम आहे बघतो. तुम्ही कुठे रहाता? असे विचारुन मी त्याचा पत्ता घेतला.
चार दिवसानंतर दौलतनगर भागात मी गेलो होतो. मला त्या दिवशी सावंत चष्मेवाल्याच्या दुकानात त्या माणसाकडून घेतलेला पत्ता आठवला. मी पत्ता शोधत शोधत झोपडपट्टीसदृश्य एका चाळीत पोहोचलो. अमृत कांबळीची खोली एका मुलाने लांबून दाखविली. दार लोटलेले होते. मी दारावर टकटक केली. थोड्यावेळ्याने वीस-बावीस वर्षाच्या गाउन घातलेल्या एका मुलीने दार उघडले. त्या मुलीच्या चेहर्याकडे मी पाहातच राहिलो आणि हा चेहरा कुठेतरी पाहिला आहे असे वाटू लागले. नुसता पाहिला नाही.
तर माझ्या जवळच्या ओळखीचा चेहरा होता. पण कोण असेल? कारण या भागात मी कधी आलो नव्हतो. या मुलीला आधी पाहण्याची शक्यता नव्हती. ‘‘कोण हवं?’’ ती मुलगी मला विचारत होती. ‘‘मी सामंत. एलआयसी एजंट आहे. अमृत कांबळी त्या दिवशी मला भेटले होते. त्यांनी त्याच्या बायकोचे एलआयसी संदर्भात काही काम आहे असे म्हणाले, त्यांनी पत्ता दिला म्हणून मी आता आलो.’’ ‘‘होय माझेच काम आहे एलआयसीमध्ये, तुम्ही करुन देणार काय?’’ हो, बघू तर - मी म्हणालो.
मी आत गेलो. एका मोडक्या प्लॅस्टिक खुर्चीवर बसलो. घरात नजर टाकली. कशीबशी दहाबारा भांडी चटईवर मांडली होती. एक लहान मोरी होती. त्यात रात्रीची भांडी धुवायला ठेवली होती. एक स्टोव्ह होता. त्यावर काहीतरी शिजत होते. दोरीवर कपडे सुकत होते. एक ट्रंक होती. त्यावर कपड्याचे बोचके होते. त्या मुलीने ट्रंक उघडून एक पॉलिसी बाहेर काढली. आणि त्यावरील धुळ झटकून माझ्या हातात दिली. मी पॉलिसी हातात घेतली. ‘‘ही पॉलिसी मोडायची आहे.’’ ती मुलगी म्हणाली. मी ती पॉलिसी चाळली. आणि तिला म्हणालो - ‘‘तुमची पॉलिसी अजून २५ वर्षांनी संपणार आहे. आता ही बंद केलीत तर तुम्हाला फारसे काही मिळणार नाही. तुमचे खूप नुकसान होईल.’’ ‘‘ही पॉलिसी माझ्या आईने वडिलांच्या मागे लागून सुरु केली. पण मला आता त्याचे हप्ते भरणे शक्य नाही, मला पैशांची फार गरज आहे.’’
मी एलआयसी मध्ये गेली २५ वर्षे काम करणारा माणूस तशी सहजा सहजी ही पॉलिसी कसा बंद करु देईन. मी थोडा विचार केला आणि तिला म्हणालो, ‘‘तुझे आई बाबा कुठे राहतात?’’ शिरोड्याला - ती म्हणाली. काय नाव त्यांचे? ती म्हणाली - ‘‘उत्तम साळगावकर आणि आई सुवर्णा साळगावकर.’’ सुवर्णा हे नाव ऐकताच मला काहीतरी ओळखीचे वाटले. सुवर्णा म्हणजे माहेरची कोण? मी विचारले. ‘माहेरची सुवर्णा आजगावकर.’ सुवर्णा आजगावकर म्हणजे वेंगुर्ल्याची काय? होय - वेंगुर्ल्यात भटवाडीत माझे आजोळ. मी एकदम थरारलो. डोके झिणझिणले. मन पंचवीस वर्षे मागे धावू लागले.
सावंतवाडीतील कॉलेज दिवस आठवले. खेडेगावातून आलेला मी आठवलो. कॉलेजच्या दुसर्या वर्षाला असताना कुणीतरी सांगितले, कॉलेजतर्पेâ आकाशवाणीवर शृतिका होणार आहे. त्यासाठी चांगले बोलू शकणारे कलाकार हवे आहेत. प्राध्यापक अवसरे हे वाचन घेत आहेत. गावात असताना छोटी मोठी नाटके करत होतो. खूप इच्छा होती आणखी काही करायची. धाडस करुन गेलो.
अवसरे सर मुलांचे वाचन घेत होते. मी धडधडत्या काळजाने माझे नाव दिले. मला नाटकातला एक प्रवेश वाचायला दिला. बहुतेक सरांना माझे वाचन आवडले असावे. सरांनी दुसर्या दिवशी भेटायला बोलावले. सरांनी शृतिकाच वाचायला दिली. आणि उद्या संध्याकाळी ४ वाजता वाचनाच्या तालमी होतील असे सांगितले. आम्ही दोन मुलगे निवडले गेलो होतो. आम्ही सरांकडे वाचन करत होतो तेवढ्यात काळीसावळी पाणीदार डोळ्यांची तरतरीत मुलगी आणि तिची मैत्रिण हजर झाली. सरांनी आमची ओळख करुन दिली. ‘‘ही सुवर्णा आजगावकर, दुसर्या वर्षाला आहे.’’ ही या शृतिकेत तुम्हा दोघांबरोबर असणार आहे. सुवर्णाने माझ्याकडे पाहून हलकेसे स्मीत केले. त्यानंतर रोज सायंकाळी अवसरे सरांच्या केबीनमध्ये आमचे वाचन सुरु झाले.
मी आणि सुवर्णा प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत. त्यामुळे आम्हा दोघांचे संवाद जास्त व एकत्र. दोन दिवसात लक्षात येऊ लागले मी प्रियकराच्या भूमिकेत जास्त मन लावून संवाद म्हणू लागलो आहे. सर खुश होते. त्यांच्या मनासारखे दोनही कलाकार आपल्या भूमीकेत रंगू लागले होते. मला आता सायंकाळी ४ वाजण्याची घाई होत होती. मी साडेतीन वाजताच सरांच्या केबीन बाहेर उभा राहू लागलो. माझ्या लक्षात आले सुवर्णापण हातात पुस्तके घेऊन हजर असायची. हळूच हसायची. तिची चुळबुळ सुरु असायची. शृतिकेसाठी आम्हाला पणजी आकाशवाणीवर जायचे होते. सर येणार नव्हते. कॉलेजतर्पेâ गाडीची सोय केली होती.
गाडीमध्ये ड्रायव्हर आणि शृतिकेत भाग घेणारे आम्ही तिघे आणि सुवर्णाची मोठी बहीण. गाव, कॉलेज सोडून विशेष बाहेर न पडणार्या आम्हांला गोव्याच्या हद्दीत प्रवेश करताना कानात वारं शिरलेल्या वासरासारखी परिस्थिती झाली. गाणी काय, विनोद काय, नाटकांतले संवाद, शिक्षकांच्या नकला एकंदरीत सुवर्णा माझ्या नकलांवर आणि विनोदावर जास्त प्रतिसाद देत होती. हळूहळू तारा जुळत होत्या.
पणजी आकाशवाणीवर रेकॉर्डिंग छान झाले. कॉलेजतर्पेâ हॉटेल टुरिस्टमध्ये जेवण झाले आणि वेळ होता म्हणून कळंगुट बीचवर जाण्याची टुुम निघाली. कळंगुट बीचवर सगळे उन्मादक वातावरण. सगळीकडे हातात बियर घेतलेले अर्धनग्न हिप्पी नाचत होते, गाणी म्हणत होते. आमच्या ड्रायव्हरने दोन बियर टीन आणले. एक स्वतः संपवला आणि एक आम्हा दोघांना. सुवर्णा आणि तिच्या बहिणीने कोकाकोला घेतला. त्या समुद्राकडे पाहत प्यायलेली ती अर्धी बियर आज कित्येक वर्षे लक्षात आहे. कळंगुट ते सावंतवाडी परत प्रवासात आयुष्यात प्यायलेली अर्धी बियर तिची किक आणि गाडीत शेजारी सुवर्णा असा योग पुन्हा आयुष्यात आला नाही.
पणजी आकाशवाणीची शृतिका लागण्याची तारीख जवळ आली आणि कॉलेजच्या सर्व गेटवर त्याचे बोर्ड लागले. बोर्डावर माझा आणि सुवर्णाचा जवळ-जवळ फोटो लावला होता. कॉलेजमध्ये माझे आणि सुवर्णाचे नाव सर्वमुखी झाले. आणि मुलगे मला आणि मुली सुवर्णाला एकमेकांच्या नावांवरुन चिडवू लागले. तो काळ रेडिओचा होता. अजून कोकणात दूरदर्शन आले नव्हते.
सिंधुदुर्गाच्या सर्व पेपरमध्ये या शृतिकेसंबंधी छापून आले. आणि घराघरात ही शृतिका ऐकली गेली. सावंतवाडीत आम्ही दोघे हिरो-हिरोईन असल्यासारखे कौतुक झेलत होतो. सर्व काही आनंदात चालले होते. पण आठ दिवसात सुवर्णात कॉलेजमध्ये यायची बंद झाली. माझी नजर तिला शोधत होती. भयंकर अस्वस्थ झालो. कुणाकडे चौकशी करावी हे कळेना. असाच केमिस्ट्री लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत होतो. तिथे सुवर्णाची मैत्रीण मला भेटायला आली. मला बाहेर घेऊन ती म्हणाली - सुवर्णाचे उद्या लग्न आहे.
खरं तर सुवर्णाला तू आवडत होतास पण सुवर्णाने शृतिकेत काम केलेले तिच्या घरी सांगितले नव्हते. तिचे वडील कॉलेजात येऊन गेले. तिथे तुमचे दोघांचे लागलेले फोटो त्यांनी पाहिले. त्या रागाच्या भरात ते सुवर्णाला घरी वेंगुर्ल्याला घेऊन गेले. आणि दोन दिवसात नात्यातील माणसाशी तिचे लग्न जमवले. तिचे वडील माथेफिरु आहेत. तिच्या आईने खूप सांगून पाहिले. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सुवर्णाने मुद्दाम मला तुझ्याकडे पाठविले. ही घे सुवर्णाची चिठ्ठी. मी चिठ्ठी उघडली. सुवर्णाने लिहिले होते. ‘‘मला विसरुन जा. नाईलाजाने मला लग्न करावे लागत आहे. माझ्या वडिलांसमोर कोणाचे काही चालत नाही. तुझ्यासारख्या मुलाबरोबर आयुष्य काढायची इच्छा होती. तुझ्यासारखा पुस्तकं वाचणारा, कविता पाठ करणारा, नाटकात काम करणारा जीवनसाथी मला हवा होता. पण आता सर्व हे विसरुन जा.’’ - सुवर्णा आजगावकर.
सुवर्णाची मैत्रीण गेली. मी हातातील चिठ्ठी किती वेळ वाचत होतो. सुवर्णाची ही पहिली आणि शेवटची चिठ्ठी. काय करणार होतो मी? हिंदी सिनेमातल्या हिरोसारखा आदल्या रात्री घोड्यावरुन बसून हिरॉईनला पळवून नेणार होतो की भर लग्नमंडपात नवरीला उचलून नेणार होतो? जेमतेम २० वर्षाचा खेडेगावातला मुलगा काय करेल यावेळी? सुन्न होऊन बसलो होतो.
गेल्या दोन महिन्यातली सुवर्णाची ओळख. पण ती खूप जवळची वाटत होती. दोन दिवस सावंतवाडी सोडून गावी आलो. आणि डोकं शांत करण्याचा प्रयत्न केला. सुवर्णा हा विषय थांबवून अभ्यासावर लक्ष द्यायचे हे ठरविले. परीक्षा दिल्या, ग्रॅज्युएट झालो. एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसरची भर्ती होती, तिकडे अर्ज केला, परीक्षा दिली आणि एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून रुजू झालो. यथावकाश लग्न झाले. मुलगी झाली. चारचौघांसारखा संसार सुरु होता. ऑफिसमध्ये कामात प्रगती करत होतो. नवीन नवीन टार्गेट मिळत होती. ती पुरी करण्याचा आटापीटा सुरु होता. मुलीचे शिक्षण सुरु होते. मुलगी हुशार होती. पत्नी संमजस होती. जिल्ह्याच्या ठिकाणी चांगले घर झाले. गाडी आली. सर्व काही होते. पण कातरवेळी एकटा असताना सावंतवाडीच्या कॉलेजच्या जवळून जाताना सुवर्णाची आठवण होत होती.
आणि आता समोर सुवर्णाची मुलगी हातात पॉलिसी घेऊन उभी होती, तिला पाहिले तेव्हाच वाटले होते, या मुलीला कुठेतरी भेटलोय. सुवर्णाची मुलगी थेट सुवर्णासारखी दिसत होती. फक्त थोडा रंग सावळा होता इतकेच.
मागील आठवणीतून मी बाहेर आलो आणि सुवर्णाच्या मुलीस म्हटले, ठीक आहे मी ही पॉलिसी सोबत नेतो काय करता येईल ते पाहतो आणि कळवितो. मी तिथून निघालो आणि ठरविले आता शिरोड्याला जाऊन सुवर्णाला भेटायचे. २५ वर्षे झाली सुवर्णाला पाहून कशी दिसत असेल सुवर्णा? ओळखेल का मला ती?
दुसर्याच दिवशी मी शिरोड्याला पोहोचलो. चौकशी करत उत्तम साळगावकरांचे घर शोधून काढले. समुद्राच्या बाजूला मच्छिमार वस्तीत त्यांचे घर होते. माझे काळीज धडधडत होते. जवळपास २५ वर्षांनंतर सुवर्णा दिसणार होती. ओळखेल का मला ती?
मी साळगावकारांच्या घराजवळ गाडी उभी केली आणि बॅग घेऊन त्यांच्या आवारात प्रवेश केला, बाहेरच्याच बाजूला ओसरीवर साडी नेसलेली एक स्त्री तांदूळ निवडत होती. माझ्या पावलांचा आवाज ऐकून तिने मान वर केली, नजरा नजर झाली, मी सुवर्णाला एका क्षणात ओळखले. खूप फरक पडला होता सुवर्णात, जराशी स्थूल झाली होती. केस कमी आणि पांढरे व्हायला लागले होते. माझ्याकडे निरखून पाहत ती हसली. तिने मला ओळखले असावे. ‘‘ये, किती वर्षांनी आलास? जेव्हा यायचे होते तेव्हा आला नाहीस,
ये आत ये.’’ मी तिच्या घरच्या ओसरीवर बसलो. तिने घरातून एक खुर्ची आणली आणि म्हणाली, बस. आज कसा काय आलास? आणि पत्ता कोणी दिला? मी म्हणालो, पत्ता तुझ्या मुलीने दिला. मी एलआयसी मध्ये नोकरी करतो. मी बॅगेतून ती पॉलिसी बाहेर काढली. तुझ्या मुलीने ही पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ही पॉलिसी अजून २५ वर्षे चालणारी आहे. आता पॉलिसी बंद केली तर त्याचे फार नुकसान होईल. फार काही रक्कम मिळणार नाही. हे सर्व मी तुझ्या मुलीला सांगितले. हप्ते वेळेवर भरुन पॉलिसी चालू ठेवण्यात तिचे भले आहे पण ती काही ऐकायलाच तयार नाही. ही पॉलिसी तिच्या वडिलांनी सुरु केली असे ती म्हणाली. मी तिच्या आई वडिलांचा पत्ता मागितला. तिने दिलेल्या पत्त्यावर मी आलो. पण इथे तू भेटशील याची कल्पना नव्हती.
‘‘खूप उशिरा आलास, मी २५ वर्षापूर्वी तुला चिठ्ठी पाठविली होती. मला वाटलं होतं तू काही धावपळ करशील, शेवटच्या क्षणापर्यंत मी वाट पाहत होते. शेवटी बाबांपुढे कुणाचे काही चालले नाही. माझे लग्न झालेच! माझे पती गोव्याला कामाला असतात. पण हल्ली त्यांचीपण नोकरी सुटली. निलिमा माझी एकुलती एक मुलगी. शिक्षणात काही फार हुशार नव्हती. बारावीनंतर तिने शाळा सोडली. इथून सगळे ट्रक रेडीला मायनिंग भरायला जातात. ते ट्रक ड्रायव्हर जेवायला माझ्याकडे येतात, त्यामुळे त्याचे दोन पैसे आमच्या संसाराला मिळतात. अशाच एका तुमच्या शहरातील ट्रक ड्रायव्हर बरोबर माझ्या मुलीचे सूत जमले.
त्या दोघांचे प्रेम पाहून मीच त्या लग्नाला पाठिंबा दिला. माझे प्रेम असफल झाले तसे तिचे व्हायला नको. मला माहिती आहे की, माझा जावई गरीब आहे पण तो प्रामाणिक आहे. माझी मुलगी कष्टाळू आहे. दोघेही मेहनत करतील. माझा नवरा तिच्या लग्नाला परवानगी देणार नव्हताच. म्हणून मीच तिला पळून लग्न करण्याचा सल्ला दिला. तिच्या बाबानी खूप आरडाओरड केला, गोंधळ केला पण शेवटी करणार काय? आता त्यांनी तिचे नाव टाकले. आता गप्प बसलेत. माझा जावई कमी शिकलेला आणि गरीब असला तरी हिंमतवान आहे तुझ्या सारखा नाही.’’
मी खाली मान घालून ऐकत होतो. तिच्या शेवटच्या वाक्याने मी शरमिंदा झालो. माझ्या हातातील पॉलिसीकडे बघून ती म्हणाली ‘‘मीच मागे लागून ह्यांना निलिमा साठी ही पॉलिसी घ्यायला लावली, आता तिला पॉलिसीचे पैसे भरता येत नाहीत. पण तू माझ्यासाठी एक काम कर ही पॉलिसी तुझ्याचकडे ठेव, या पॉलिसीचे हप्ते तू भर आणि तुझ्या शहरात निलिमासाठी नोकरी बघ. मला माहिती आहे ती फार शिकलेली नाही पण तू एवढ्या मोठ्या कंपनीत आणि मोठ्या पदावर आहेस तू तिला कुठे ना कुठे नोकरी बघशिलच.
मी मान हलवत होतो. तेव्हा ती म्हणाली, ‘‘हां आणि परत इकडे येऊ नकोस. माझ्या नवर्याला ते आवडणार नाही.’’
मी बॅग घेऊन बाहेर पडलो. गाडी स्टार्ट करता करता दोन गोष्टी ठरविल्या. मी निलिमासाठी नोकरी पाहणार होतो आणि पॉलिसीचे पुढील सर्व हप्ते मीच भरणार होतो.

Post a Comment