जीवनात सर्वांनी संयम ठेवलाच पाहिजे.

 जीवनात सर्वांनी संयम ठेवलाच पाहिजे.


नवरात्रात मीनल आईकडून मुद्दाम जोशी काकांकडचं काम मागून घ्यायची.नवरात्रात मीनल आईकडून मुद्दाम जोशी काकांकडचं काम मागून घ्यायची.काकांनी मनोभावे पूजा आणि अभिषेक करून सजवलेल्या देवीचं रूप बघायला मीनलला फार आवडायचं. खरंतर काका एकटेच राहायचे पण तरीही ते प्रत्येक सणवार अगदी साग्रसंगीत साजरा करायचे. 

स्वैपाकाच्या मावशींना सांगून काका देवीसाठी रोज वेगवेगळा नेवैद्य करून घ्यायचे आणि त्यातला थोडा आठवणीने मीनलसाठी काढून ठेवायचे. मीनल आली की आधी तिला बसवून तो खायला लावायचे आणि तो खाल्ल्यावर मगच तिला काम करू द्यायचे. शिवाय खाता खाता मीनलला देवीच्या रोजच्या रूपाची छान छान माहितीही द्यायचे. काकांकडून देवीच्या गोष्टी ऐकायला मीनलला मनापासून आवडायचे.

काकू असल्यापासून मीनलची आई जोशींकडे काम करायची. लहानपणापासून मीनल आईबरोबर जात येत असल्याने काका काकू दोघांचीही मीनलला खूप सवय होती. तेही दोघं तिच्याशी प्रेमाने वागायचे. त्यामुळे इतर कुठल्या घरी फारसं तोंड न उघडणारी मीनल काकांशी मात्र खूप गप्पा मारायची. 

आजही काकांकडून देवीची महती ऐकून मीनल तिच्या पुढच्या कामासाठी वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटमधे गेली.

त्या फ्लॅटमधे राहाणाऱ्या सोनिया मॅडम नविनच राहायला आल्या होत्या. जोशीकाकांनीच विश्वासू म्हणून मीनलच्या आईला काम द्या असं त्यांना सुचवलं होतं. काकांच्या शब्दावर विश्वास ठेवून सोनियाही बिंधास्तपणे काकांकडे चावी ठेवून कामाला जात होती. मग मीनल किंवा तिची आई जी कोणी येईल ती काकांकडून चावी घेऊन सोनिया मॅडमचं काम करत होती.

मीनल रोजच्यासारखी केर काढायला झाडू घेऊन बेडरूममधे गेली तर आज तिथे खूप पसारा पडला होता. सोनिया मॅडमच्या दोन तीन साड्या बेडवर पडलेल्या होत्या. ड्रेसिंग टेबलवर त्यांच्या मेकअपचे सामान पसरलेले होते. खडे लावलेल्या लाल रंगाच्या टिकल्यांची पाकीटं, लाल,मरून, गुलाबी अशा विविध शेड्सच्या लिपस्टीक्स, आय लायनर, परफ्यूमच्या बाटल्या आणि अजूनही बरंच काही.

त्या टिकल्या आणि लिपस्टीक्स पाहून मीनल हरखून गेली. ती लाल रंगाची लिपस्टीक लावून पाहावी किंवा यातली एक तरी महागडी टिकली आपल्या कपाळावर चिकटवून पाहावी अशी अनावर इच्छा तिला झाली. आज लाल रंग आहे. देवीलाही तो आवडतो मग आपण ही लाल लिपस्टीक लावली तर काय होणार आहे? शिवाय आत्ता इथे बघायलाही कोणी नाही.जिथे कामाला जायचे तिथल्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला आईला आवडत नाही. पण आज आईला कशाला कळतय. जातांना तोंड पुसलं की झालं..

असा विचार करून लिपस्टीक उचलून मीनल आरशासमोर जाऊन उभी राहिली. घरात कोणी नाही हे माहिती असूनही तिने हळूच इकडेतिकडे बघितलं आणि ती लिपस्टीक उघडून लावणार इतक्यात तिला आईचे वटारलेले डोळे आठवले. शिवाय आपण त्यांच्या सामानाला हात लावलेला जर मॅडमना कळलं आणि त्यांनी आईला किंवा जोशीकाकांना सांगितलं तर..

आत्ताच काकांनी आपल्याला सांगितलं की देवीच्या पूजेने आपले आचरण चांगले होते, संयम वाढतो. मग हे माझे वागणे चांगले आहे का? ही अशी एक दिवस लिपस्टीक लावून काय होणार? त्यापेक्षा आई म्हणते तसं भरपूर अभ्यास करून नोकरी मिळवल्यानंतर स्वतःच्या पैशांनी घेतलेली लिपस्टीक केव्हाही चांगली.

असा विचार करून मीनलने ती लिपस्टीक न उघडताच परत ठेवून दिली आणि काम आटोपून मीनल जोशीकाकांकडे चावी द्यायला गेली.

चावी घेऊन काकांनी तिच्या हातात एक पिशवी ठेवली घरी न्यायला.  ज्यात एक सफरचंद आणि थोड्या स्ट्रॉबेरीज होत्या. ते पाहून मीनलला खूप आनंद झाला.

मीनलला खरंतर स्ट्रॉबेरी खूप आवडायच्या पण  महाग म्हणून आई घेऊन द्यायची नाही. त्यातल्याच दोन स्ट्रॉबेरी खात खात मीनल घरी गेली आणि मीनलचे ओठ त्या महागड्या लिपस्टीकपेक्षाही या ओरिजनल रंगाने जास्त छान रंगले.

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही.कृपया याला offical वेबसाईट म्हणून मानू नका आणिखाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवामोबाईल क्रमांक यासारखा कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्वअभ्यागतांनासंबधित तक्रारी,योजनेबद्दल क्रेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या offical संकेतस्थळावर किवां अधिकाऱ्यांनाभेट देन्यासाठी विनंती करतो.धन्यवाद !

Powered by Blogger.